अतुल चिंचली - पुणे : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी प्रशासन शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याचे आवाहन करीत आहे. परंतु घाणीच्या साम्राज्यात काम करीत असणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी माहिती सफाई कामगारांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद केली आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कोणालाही होत आहे. सफाई कामगार सतत घाणीत काम करीत असतात. कोरोनाकडे पाहता स्वच्छ राहण्याचे आवाहन केले जात आहे. जे ऑफिसमध्ये काम करीत आहेत. त्यांनाही मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. सफाई कामगार मास्क, हॅन्डग्लोव्हज नसतानाही काम करीत आहेत. महानगरपालिकेने त्यांना कुठल्याही प्रकारचं साहित्य दिलेले नाही. त्याचप्रमाणे कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. बरेच सफाई कामगार झोपडपट्टीत राहणारे आहेत. घरी जाताना ते अनेक ओळखीच्या लोकांना भेटत असतात. त्यामुळे एखाद्या सफाई कामगाराला कोरोनाचा प्रादुर्भाव भविष्याकरिता प्रचंड हानिकारक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले..............भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत काम करतो. झाडून काढणे, कचऱ्याचे ढीग उचलणे अशी कामे करावी लागतात. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महानगरपालिकेकडून कुठलंही साहित्य दिले नाही. शिवाय आमची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. प्रशासनाने सफाई कामगारांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करावी; तसेच मास्क, हँडग्लोव्हज असे साहित्यही पुरवावे. - विशाल कांबळे, सफाई कामगारय्.............गेली कित्येक वर्षे प्रशासनाकडे आरोग्य, काम करताना लागणारे साहित्य याविषयी मागणी करीत आहोत. पण त्या पूर्ण केल्या जात नाहीत. आता ही कोरोना फारच गंभीर साथ आहे. यापासून लांब राहण्यासाठी स्वच्छ राहणे गरजेचे आहे. मी मंगळवार पेठमध्ये झाडून काढण्याचे काम करते. अशा वेळी आमच्याकडे सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे. - आरती खरारे, सफाई कामगार.................
कोरोनासंबंधी काळजी, दक्षता ठीक ! पण स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:06 PM
सफाई कामगार मास्क, हॅन्डग्लोव्हज नसतानाही करीत आहे काम
ठळक मुद्देएखाद्या सफाई कामगाराला कोरोनाचा प्रादुर्भाव भविष्याकरिता प्रचंड हानिकारक