पक्षी निरीक्षणाचे नानाविध प्रकार आहेत. दुर्बिणीतून, दुर्बिणीविना साध्या डोळ्यांनी, पक्ष्यांचे आवाज ऐकून करता येते. आपल्याकडे खेड्यापाड्यात पक्षी ओळखण्याचे आगळेवेगळे तंत्र विकसित आहे. या क्षेत्रात नोंदी ठेवून अभ्यासपूर्ण कार्य पहिल्यांदा डॉ. सालीम अली यांनी केले. त्यांनी भारतवर्षात व आसपासच्या देशात, पक्षीनिरीक्षण करून पक्षी विज्ञानाचा पाया रोवला, नव्हे तर तो भक्कम केला.
पक्षी निरीक्षणाची तयारी करायची म्हणजे थोडे वाचन, सोयीस्कर पोशाख, नोंदी ठेवण्यासाठी छोटीशी वही, उत्तम क्षमतेची छोटेखानी दुर्बीण, कॅमेरा आदी गोष्टींची आवश्यकता असते. पक्षीनिरीक्षण हे पानथळ, दलदलीची ठिकाणे, तळे, नदी, समुद्र किनारे, धरण, सरोवर तसेच घनदाट जंगल, माळरान, दाट झाडीच्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास असणा-या भागात केले जाते. पक्षी निरीक्षणाची उत्तम वेळ ही सकाळी जेव्हा पक्षी अन्नासाठी बाहेर पडतात किंवा सायंकाळी पिलांच्या, जोडीदाराच्या ओढीने माघारी येतात. त्यावेळी असते. दुपारी अनेकदा पक्षी विश्रांती घेतात. त्यामुळे ही वेळ टाळता आली तर उत्तम.
पक्षी निरीक्षक म्हणून करीअर निवडता येइल का? तर उत्तर होय असेच आहे. यासाठी प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्राचे विद्यार्थी, संख्याशास्त्र, पदार्थविज्ञानाचा अभ्यास असणारे अभ्यासक या पक्षी विज्ञानाकडे आकर्षित होऊ शकतात. पक्षी निरीक्षक, निसर्ग अभ्यासक, पक्षीसंवर्धक, स्थलांतर अभ्यासक, पक्षी प्रजननशास्त्रज्ञ, अनुवंशिकीशास्त्र असे वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. या अभ्यासकांना म्हणजे पक्षी वैज्ञानिकांना, वनखाते, सामाजिक वनखाते, वन्यजीव खाते, प्राणी/ पक्षी संग्रहालये अशासकीय संस्था किंवा काही शासकीय संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते. आपल्याकडे भारतामध्ये सालीम अली सेंटर, भारतीय कृषिविज्ञान संशोधन केंद्र, पक्षी संरक्षक संस्था, पक्षी व वनस्पती कल्याण संस्था अशा ठिकाणी पक्षी निरीक्षणाच्या मोठ्या संस्था आहेत.
पक्षी निरीक्षणाचे अभ्यासक्रम शिकविणा-या शैक्षणिक संस्था
1) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
2) आबासाहेब गरवारे महाविद्यालय
2) बरकत उल्लाह विद्यापीठ भोपाळ
3) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई,
4) आयसर पुणे
5) सेंट झेव्हियर महाविद्यालय मुंबई
6) एस. एस. जैन महाविद्यालय, जयपूर
7) किंग्ज इंजिनिअरिंग कॉलेज, इंदापूर
उजनीच्या काठावर डिक्सळ, कुंभारगाव, डाळज, भादलवाडी, शहाची पिरान टेकडी या ठिकाणी अनेकानेक पक्षी बघायला मिळतात. भोरड्या, रोहित, बगळे, ढोक, गुस, चमच्या, हळद्या, नदीसुरय, करकोचे हंस, सूर्यपक्षी, कोतवाल, लालबुड्या, मुनीया, मैना, वेडा राघू, कोकीळ, चांभार कोंबडा, इबिस, पानकावळे, कोरभोंदुड असे हजारो पक्षी व त्यांच्या जाती पाहता येतील. या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणा-यांनी जेथे पक्षी दिसतील त्याच्या रितसर नोंदी जरूर ठेवाव्यात.
- संजय चाकणे, प्राचार्य, कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर