वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सीए, सीए हा ऑडिट, टॅक्सेशन, गुंतवणूक, वित्त आदी क्षेत्रांत करिअर करता येते. तसेच सीए हा स्वत: प्रॅक्टिस करू शकतो किंवा नोकरीही करू शकतो. सीएला ऑडिटर, कर सल्लागार, इन्व्हेस्टमेंट बँकर, आदी स्वरुपात प्रॅक्टिस किंवा नोकरी करता येते. सीएची परीक्षा इन्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्न्स ऑफ इंडिया मार्फत (आयसीएआय) घेतली जाते.
दुसरे लोकप्रिय मात्र कठीण करिअरचे क्षेत्र म्हणजे कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरी हा कंपनीची कायदेशीर व वैधानिक बाजू सांभाळण्याचे काम करतो. कंपनी कायद्याच्या बाबतीत नियोजनात मदत व कायद्याबाबत सल्ला देण्याचे काम करत असतो. सीएसची परीक्षा दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे घेतली जाते. सीएस झालेल्या विद्यार्थ्यांना खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करता येते.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सीएमए बनूनही करिअर करता येते. यामध्ये कॉस्ट अकाऊंटंट तसेच ऑडिटिंग, वित्तीय सल्लागार म्हणून काम करता येते. सीएमए हा वित्तीय क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर देखील काम करु शकतो. वित्त संचालक, वित्तीय नियंत्रक, खर्च नियंत्रक आदी पदांवर तो काम करू शकतो. सीएमए ची परीक्षा तीन टप्प्यात होते.
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापनाचे क्षेत्र करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. विद्यार्थ्यांना मानव संसाधन, मार्केटिंग, फायनान्स, आंतरराष्ट्रीय व्यापार, हॉस्पिटल, मॅनेजमेंट, आदरातिथ्य व्यवस्थापन आदी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
इतर क्षेत्राप्रमाणेच भारतातील बँकिंग क्षेत्रातसुध्दा वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना यात चांगल्या संधी आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) बनणे हा उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे क्लरिकल पदांसाठी देखील परीक्षा देता येते. बँकिंग क्षेत्राबरोबरच वित्त, विमा, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडस् आदी सर्व क्षेत्रांत वेगाने विकास होत आहे. विशेष म्हणजे यात केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे काम करता येणे शक्य आहे. तसेच वाणिज्य शाखेतील शिक्षण घेताना अर्थशास्त्र, गणित व संख्याशास्त्र चांगल्या प्रकारे शिकून पदव्युत्तर शिक्षण या विषयांत करिअर करता येते.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाच्या बाबी :-
१) करिअर कोणतेही असले तरी इंग्रजी भाषेवर पकड हवीच.
२) करिअरशी संबंधित कॉम्प्युटर- टॅली, एक्सेल आदी संगणकीय ज्ञान असलेच पाहिजे.
३) आपल्या क्षेत्रातील प्रश्न सोडवता येण्यासाठी लॉजिकल थिंकिंग करता आलीच पाहिजे.
- डॉ. सुरेश वाघमारे ,उप-प्राचार्य, बीएमसीसी (स्वायत्त)