आपल्या समाजामध्ये आयुर्वेदाविषयी आदर आणि महत्त्व आहेच, पण काहींना या उपचार पद्धतीबाबत काही गैरसमजही आहेत. हे गैरसमज दूर करणे आणि जागतिक पातळीवर आयुर्वेदाचा प्रसार करणे, त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळेच पाच हजार वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेल्या आयुर्वेदाचे महत्त्व आजच्या पिढीला समजावून सांगण्यासाठी त्यांच्या भाषेत, बदलत्या काळानुरूप, तसेच वैद्यकीय व आरोग्यसेवा क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या परिपेक्षात मांडणे गरजेचे आहे. ही मांडणी करताना आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रम कसा निवडायचा, हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ या.
आयुर्वेद विद्याशाखेचा बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएएमएस) हा पदवी अभ्यासक्रम आपल्याला सर्वांनाच माहिती असतो. प्रशिक्षणार्थी कालावधीसह साडेपाच वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो, तसेच पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुर्वेद शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमडी) आणि एमएस (आयुर्वेद) या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येतो. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्धा या आयुष मंत्रालयाच्या संस्थेमार्फत आयुर्वेदाशी संबंधित संशोधन संधीही उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रम कसा निवडावा?
- आयुर्वेदाच्या मूलतत्त्वांची कास धरून, त्याचा प्रसार आधुनिक पद्धतीने होण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी, तसेच आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन बाळगून वैद्यकीय अभ्यासक्रम निवडले पाहिजेत.
- आयुर्वेदातील कोणत्या विषयामध्ये आपल्याला रस आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याचबरोबरीने आधुनिक विज्ञानाशी संबंधित समांतर व समकालीन क्षेत्राचा विचार करावा.
उदाहरणार्थ, आयुर्वेदाची विद्यार्थी म्हणून मला रसशास्त्र या विषयात एमडी अभ्यासक्रम करायचा होता. रसशास्त्रातील औषधांमध्ये नॅनोपार्टिकल्सचा संबंध येतो आणि त्यामुळे मी युनायटेड किंगडममधील (युके) वेल्स येथे असलेल्या स्वॉनसी युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये एमएससी नॅनोमेडिसिन हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचे ठरविले. जागतिक पातळीवर नॅनोमेडिसिन क्षेत्राच्या परिपेक्षात आयुर्वेदिक नॅनोमेडिसिनचा अभ्यास करणे त्यामुळे शक्य झाले. आजच्या विज्ञानशास्त्र विश्वाला समजेल, अशा पद्धतीने त्यांच्या भाषेत आयुर्वेदाचा प्रसार व अभ्यास करण्याची संधी त्यामुळे मिळाली. प्रत्येक जण आपल्या आवडीचे अभ्यासक्रम शोधून ते निवडू शकतो. अशा नव्या पर्यायांची माहिती सहजपणे इंटरनेटवर उपलब्ध आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणखी एक नवी संधी म्हणजे युकेमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी येथे एमएससी एव्हिडन्स बेस्ड हेल्थकेअर हा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार हा पुराव्याधारित व योग्य पद्धतीने करणे शक्य होणार आहे. आयुर्वेदामध्ये नावीन्यता आणि प्रगती साधण्यासाठी असे काही मार्ग आपल्याला निवडावे लागतील.
बीएएमएस पदवी शिक्षणानंतर अपारंपरिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी कोणतेही नियम अथवा निकष नाहीत. एमडी आणि एमएस यासारखे पारंपरिक अभ्यासक्रमही चांगले आहेत व इच्छुक विद्यार्थ्यांनी त्याचाही साकल्याने विचार करावा. मात्र, अन्य पर्यायांमुळे तोच विषय वेगळ्या पद्धतीने आणि दृष्टिकोनातून शिकता येतो. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील आंतरविद्याशाखीय संशोधनामध्ये रस असेल, त्यांनी याचा विचार आवश्य करावा. हे नवे पर्याय स्विकारले, तर आयुर्वेदाचे महत्त्व जागतिक पातळीवर आणखी वाढेल आणि तरुण पिढीही आयुर्वेद क्षेत्रात जागतिक पातळीवरील दृष्टिकोन ठेवून काम करेल.