पुणे : हार्ली डेव्हिडसन मोटारसायकल विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्सवर दिली खरी पण, आगाऊ रक्कम ऑनलाईन पाठविण्याचा बहाणा करुन एकाने त्याची सर्व माहिती विचारुन चक्क १ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे़.
याप्रकरणी कोथरुड येथील एका ४६ वर्षाच्या व्यक्तीने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना ५ मे २०१९ रोजी घडली होती़. फिर्यादी यांना त्यांची हार्ली डेव्हिडसन ही मोटारसायकल विकायची होती़. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात दिली़. त्या जाहिरातीवरुन त्यांना एक फोन आला़. त्याने मोटारसायकल विकत घेण्याची तयारी दर्शवून ५० हजार रुपये आगाऊ गुगलपेवर पाठवून देतो, असे सांगितले़. त्यासाठी त्याने त्यांना लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरण्यास सांगितले़ फिर्यादी त्यांनी ती माहिती भरुन लिंक पाठवून दिली़. त्या लिंकद्वारे चोरट्याने फिर्यादी यांच्या खात्यातून १ लाख रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली़. त्यामुळे कोणी पैसे पाठवितो म्हणून एखादी लिंक पाठविली तर त्यात आपल्या खात्याची गोपनीय माहिती भरु नये़, पासवर्ड कोणाला सांगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़.