पुणे : निष्काळजीपणे दुचाकी चालवून धडक देत एका ५० वर्षीय व्यक्तीला जखमी करणा-या तरुणीला १ महिना तुरुंगवास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त सात दिवस कारावास भोगावा लागेल. दंडाची रक्कम अपघातातील जखमींना देण्यात यावी, असेही आदेशात नमुद केले आहे. वर्तिका प्रभाकर मिश्रा (वय २४, रा. वडगावशेरी) असे शिक्षा झालेल्या तरुणीचे नाव आहे. विवेकानंद रामानंद थुल (वय ५0,रा. वडगावशेरी) हे धडकेत जखमी झाले होते. त्याबाबत त्यांनी चंदननगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जुलै २०१५ रोजी वडगाव शेरी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. थुल भाजी मंडई वडगावशेरी येथून कटींग करून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. मिश्रा ही गाडी चालवत होती. या धडकेमुळे थुल व मिश्रा हे दोघे पण पडले. त्यावेळी मिश्रा हिने उठून थुल यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा, माझे वडील वकील आहेत. काही केल्यास तुमच्या विरूध्द छेडखानीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिने दिली व निघून गेली. त्यानंतर थुल यांनी मुलाला बोलावून घेतले. त्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. थुल यांनी दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार आर.एन.कांबळे यांनी मदत केली. दंड न भरल्यास अतिरिक्त सात दिवस कारावास भोगावा लागेल. दंडाची रक्कम अपघातातील जखमींना देण्यात यावी, असेही आदेशात नमुद केले आहे. ...........................
तर समाजात चुकीचा संदेश जाईल : वर्तिका हिचा हा पहिलाच गुन्हा असून ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे सुशिक्षित कुटुंबातील असल्याने तिला परीविक्षा अधिनियमातील तुरतुदीनुसार चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यास अॅड. कोळी यांनी विरोध करत अपघातात जखमी व्यक्तीला मदत करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता अपघातग्रस्त व्यक्तीला मारहाण केलेल्या व्यक्तीला परीविक्षा अधिनियमाचा लाभ देणे योग्य ठरणार नाही. त्यातून समाजात चुकीचा संदेश जाईल, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दुस-या बाजूने तरुणीचा पहिलाच गुन्हा असून, ती शिक्षण घेत आहे. याचा विचार करून शिक्षा सुनावण्यात आल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.