पुणे : कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची दखल घेत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या गेटसमोर यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ची प्रतिकृती उभारली आहे. उद्या (दि.२५) या प्रतिकृतीचे उद्घाटन सदर्न कमांडचे मेजर जनरल आर.व्ही सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी एफटीआयआय प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिकृती साकारल्या जातात. आतापर्यंत अमृतसर जालियनवालाबाग हत्याकांड (स्वातंत्र्यदिन २०१६), अंदमान सेल्युलर जेल (प्रजासत्ताक दिन २०१७), दिल्ली इंडिया गेट वॉर मेमोरिअल वॉर (स्वातंत्र्य दिन २०१८), कन्याकुमारी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरिअल (प्रजासत्ताक दिन २०१८), अहमदाबाद साबरमती आश्रम (स्वातंत्र्यदिन २०१८) आणि दिल्ली राज घाट (प्रजासत्ताक दिन २०१९) या प्रतिकृती साकार केल्या. वीस वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. साधारण दोन महिने चाललेलं कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचं प्रतिक मानलं जातं. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ द्रास परिसरात ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ उभारले आहे. त्याची प्रतिकृती यंदा एफटीआयआयने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून साकाराली आहे. एफटीआयआयच्या कला दिग्दर्शन आणि डिझाईन निर्मिती विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती उभारण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले आहे. येत्या २६ ऑगस्टपर्यंत ही प्रतिकृती पुणेकरांना पाहाण्यासाठी खुली राहणार आहे.
पुण्यात एफटीआयआयने साकारली 'कारगिल वॉर मेमोरिअल' ची प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:49 PM
कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहे. त्याच धर्तीवर '' एफटीआयआय '' ने यंदा ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ची प्रतिकृती उभारली आहे.
ठळक मुद्दे येत्या २६ ऑगस्टपर्यंत ही प्रतिकृती पुणेकरांना पाहाण्यासाठी खुली राहणार