प्रसाद कानडे
पुणे: मालाची वाहतूक प्रवाशांसोबत होणार आहे हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. रेल्वे मंत्रालय विशेष डब्यांची निर्मिती करणार आहे. यासाठी खास डबल डेकर डबे बनविले जातील. खालच्या डेकवर पार्सल ठेवले जाईल तर वरच्या डेकवर प्रवासी असतील. रेल्वेने माल व पार्सलच्या वाहतुकीतून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. हे करीत असताना प्रवासी वाहतूक करून अधिकचे उत्पन्न मिळविणे हा विचार आहे. पहिल्या टप्यात प्रयोगिक तत्वावर ४० डब्यांना मंजुरी मिळाली असून यासाठी १६० कोटी रुपये देखील मंजूर झाले आहेत.रेल्वेने एक अभिनव संकल्पना मांडली आहे. भारतात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे. आता पर्यंतच्या डबल डेकर डब्यांतून प्रवाशाची वाहतूक झाली. आता मात्र मालाची (पार्सल ) व प्रवाशांची वाहतूक पहिल्यांदाच एका डब्यांतून केली जात आहे. नव्या डब्यांत खालच्या बाजूस म्हणजेच खालच्या डेक मध्ये रिकामी जागा ठेवून तिथे माल ठेवला जाईल. तर वरच्या बाजूस प्रवाशांसाठी सीटची व्यवस्था केली जाईल. याद्वारे एकाच वेळी मालाची व प्रवाशांची वाहतूक होईल.
कसा असणार डबा :हा डबा डबल डेकर असेल. वरच्या डेकवर ७२ प्रवाशांसाठी सीटची व्यवस्था केली असेल. तर खालच्या डेक वर ६ टन सामान बसू शकेल इतकी जागा असणार आहे. कपूरथला येथील रेल कोच फॅक्ट्रीत या डब्यांचे उत्पादन होणार आहे. दिवसा प्रवास करण्यासाठी ह्या डब्यांचा वापर केला जाईल. शिवाय त्या प्रवासाचा कालावधी देखील चार ते पाच तासांचा असणार आहे. एलएचबी दर्जाचे हे डबे असतील.संकल्पना चांगली, मात्र अंमलबजावणी अवघड :दिल्ली, पुणे, मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांतील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशा ठिकाणी पाच ते दहा मिनिटांसाठी गाडीला थांबा असतो. अशा वेळी प्रवासी चढणे व पार्सल लोड करणे यासाठी मोठी धांदल उडणार आहे. ही परिस्थिती कशी हाताळली जाईल. आताच ब्रेक एसएलआरमध्ये माल ठेवताना प्रचंड कसरत करावी लागते. फलाटावरच पार्सल ठेवलेले असतात.
कार्गो लायनर अंतर्गत प्रवासी व पार्सल सेवा दिली जाईल. यासाठी प्रायोगिक तत्वावर दोन रेल्वे सुरू केल्या जाणार आहे. यासाठी जवळपास ४० डबे तयार केले जाणार आहे.गौरव बन्सल, कार्यकारी संचालक, (माहिती व प्रसिद्धी), रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.