पुणे : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने पुकारलेल्या बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलन सलग सातव्या दिवशी सुरु होतो. आंदोलनात सहभागी न झालेल्या ट्रकचालकांना गुलाबपुष्प देण्यात येत होते. मागण्या मान्य करण्याबाबत सरकारला सुबुद्धी येवो यासाठी कीर्तनही आयोजित करण्यात आले होते.इंधनाचे दर कमी करुन देशभरातील डिझेल दर समान करावा, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करु नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मालवाहतुकदार शिष्टमंडळाची अर्थमंत्री पियुष गोयल यांची बुधवारी भेट घेतली. गोयल यांनी मालवाहतुकदार आणि सरकारी प्रतिनिधींची समिती नेमून मागण्यांवर निर्णय घेईल, असा प्रस्ताव मांडला. मालवाहतुकदारांनी या प्रस्तावास नकार दिल्याने आंदोलन सुरुच राहीले आहे. दरम्यान गुरुवारी (दि. २६) पुणे माल प्रवासी वाहतूक संघटना, निगडी व फुरसुंगी ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांचे वतीने वडगाव येथील पुलावर चक्का जाम आंदोलन केले. मालवाहतुकदारांच्या मागण्या मान्य करण्याची सुबुद्धी सरकारला येवो यासाठी कीर्तन अयोजित करण्यात आले होते. तसेच आंदोलनात सहभागी न होणाऱ्या मालवाहतुकदारांना गुलाबपुष्प देऊन आंदोलनातसहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, फुरसुंगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे हरपळे, सतीश शहा, अनिल चकोते, निगडीअसोसिएशनचे प्रमोज भावसार या वेळी उपस्थित होते.मालाची आवक थांबलीमाल वाहतूकदारांनी संपूर्ण देशभर संप पुकारलेला आहे. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रात येणा-या आवका थांबल्या आहेत. पुणे बाजारपेठेत दररोज १५० ते २०० ट्रक तेल, तूप, साखर, डाळी, रवा, आटा, मैदा, बेसन, गुळ, ड्रायफ्रूट व अन्नधान्य इत्यादी मालाची आवक होत असते. ती घटून सध्या केवळ १० ते १५ ट्रक प्रतिदिन इतक्यावर आली आहे. मालाच्या तुटवड्यामुळे वस्तूंचे दर वाढत आहेत.- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन आॅफ असोशियशन आॅफ महाराष्ट्र (फाम)
मालवाहतूकदारांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 2:49 AM