केडगाव : पाटबंधारे संशोधन व विकास महामंडळाद्वारे दौंड तालुक्यातील चिबाड, क्षारयुक्त तसेच पाणथळ जमिनीच्या निर्मूलनासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावे तसेच सध्या अस्तित्वात असणाऱ्या चर योजनांचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनी केली आहे. चिबाड शेतजमीन निर्मूलन, पृष्ठभागावर व भुपृष्ठभागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे यासंदर्भात आमदार कूल यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये ते बोलत होते.
शेतीसाठी पाण्याच्या अमर्याद वापर, क्षारयुक्त पाण्याचा वापर, कालव्यातून होणार पाण्याचा निचरा, अतिक्रमणांमुळे नैसर्गिक ओढे, नाले यांच्या प्रवाहात होणार अडथळा, पूर स्थिती, रासायनिक खतांचा अतिवापर आदींद्वारे जमीन पाणथळ, क्षारपड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजमितीस नवा मुठा कालव्याच्या लाभ क्षेत्रामधील दौंड तालुक्यातील एकूण खराबा क्षेत्र हे सुमारे सात हजार २५६ एकर असून तुलनेने दुर्लक्षित परंतु भविष्यात प्रतिकूल परिणाम असणाऱ्या चिबाड शेतजमीन निर्मूलनासाठी शासनाने धोरण आखावे व कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, यासाठी आमदार राहुल कूल सातत्याने प्रयत्नशील आहेत.
बैठकीत आमदार राहुल कूल यांनी विविध मागण्या केल्या आहेत. कानगाव, सोनवडी, नानगाव, दौंड आदी ठिकाणच्या चर योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत, खामगाव, नानवीज, लिंगाळी, गलांडवाडी, पेडगाव, शिरापूर आदी गावांतील चिबड जमिनींचे सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, तांबेवाडी, गोपाळवाडी, खानोटा, पिंपळगाव, देऊळगाव राजे, गार, नानगाव, चिंचोली, कडेठाण, नानवीज, बोरिबेल, हिंगणी बेर्डी, राजेगाव आदी गावांतील चिबाड, क्षारयुक्त तसेच पाणथळ जमिनींच्या निर्मूलनासाठी खासगी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सहभागातून चर योजना राबविणेसाठी प्रयत्न करण्यात यावेत. शिरापूर, देऊळगाव आदी गावांसाठी चर योजनांच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पाटबंधारे संशोधन व विकास महामंडळाद्वारे दौंड तालुक्यातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या चर योजनांचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत आदी मागण्या केल्या आहेत.
०९ केडगाव
पुणे येथे झालेल्या बैठकीत बोलताना राहुल कूल.