पौड : लग्न लागल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दोन चारचाकी व दोन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना चाले (ता. मुळशी) येथील सुभद्रा मंगल कार्यालय येथे घडली. स्थानिक व वऱ्हाडी मंडळींनी आग नियंत्रणात आणल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुगावडे रस्त्यावर चाले येथे वहाळे व चंद्रस या परिवाराचे लग्न होते. या मंगल कार्यालयात फटाके वाजविण्यात आले. या फटाक्यांमुळे खाली असलेल्या वाळलेल्या गवताने पेट घेतला. ही आग वाढून गवतावर लावलेल्या दोन चारचाकी व पाच दुचाकींनी पेट घेतला. गाड्यांना अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली. अग्नीशामक दल येण्यापुर्वीच नागरिकांनी तत्परता दाखवत गाड्यांना लागलेली आग पाण्याने विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गाड्या जळून संपूर्ण खाक झाल्या होत्या. आग आटोक्यात आल्याने शेजारी उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या आगीतून बचावल्या.
फ्टाक्यामुळे वाहनांना लागलेल्या आगीने परिसरात धुराचे लोट पसरले होते. एका बाजूला आग विझविण्यासाठी धडपड करणारी मंडळी तर दुसरीकडे आपले वाहन वाचविण्यासाठी पळापळ करीत असलेले वाहनधारक असल्याने मुळे बराच वेळ उपस्थितांत एकच गोंधळ उडाला होता. ज्यांची वाहने जळाली त्यांना मात्र हे लग्न चांगलेच भोवले असल्याच्या प्रतिक्रिया जलीतग्रस्तांकडून येत होत्या.