पुणे : सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टलसह 10 जिवंत काडतूस व चारचाकी जप्त करण्यात आली. सुग्रीव अंकुश भंडलकर (खांडज, ता.बारामती) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये आरती बाळासाहेब मदने (रा.चौधरी वस्ती खराडी) यांनी त्यांचे पती बाळासाहेब उमाजी मदने हे मानसिक आणि शारीरिक त्रास देतात अशी फिर्याद दिल्याने पतीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतीकडे बंदुकीच्या गोळ्या आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून अधिक तपास केला. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व 6 जिवंत काडतूस विनापरवाना सापडले. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर गावठी बनावटीचे पिस्टल त्याने सुग्रीव अंकुश भंडलकर याच्याकडून 40 हजार रूपये किंमतीस विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार चंदननगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी व तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी खांडज ( ता.बारामती.जि.पुणे) याठिकाणी जाऊन सुग्रीव अंकुश भंडलकर याला ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरील कुविख्यात गुंड असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरूद्ध बारामती शहर, तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर या पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरी, चोरी व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याला 5 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस हवालदार रोहिदास लवांडे, पोलीस नाईक श्रीकांत शेडे, पोलीस शिपाई अमित कांबळे यांनी ही कारवाई केली.
------------------------------------------------------------