पुणे : व्यवसायातील गुंतवणुकीवर २० टक्के आर्थिक मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवून एका व्यावसायिकाची १९ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४), ज्योती शंकर गायकवाड (वय ५०, दोघेही रा. रास्तापेठ, शिराळ शेठ गल्ली) अशी दोघांची नावे आहेत. यातील ज्योती गायकवाड या पोलीस खात्यात नोकरीस असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी, सदाशिव राजाराम नलावडे (वय ५२, रा. शांताई हॉटेलजवळ रास्तापेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ मे २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांचा चारचाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे, तर आरोपी दाम्पत्याचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. शंकर गायकवाड हे त्यांच्याकडे नेहमीच गाड्या दुरुस्तीसाठी येत होते. त्यातूनच त्यांचा परिचय झाला होता. तसेच ज्योती या पोलीस खात्यात नोकरीस असून, पोलीस आयुक्तालयात कार्यरत असल्याचे सांगितले होते.
सन २०१९मध्ये दोन्ही आरोपींनी नलावडे यांच्या आफिसमध्ये येऊन त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांनी गुंतवलेल्या पैशातून नवीन इन्होवा किंवा चारचाकी गाडी घेऊन व तुमच्या आर्थिक गुंतवणुकीपोटी अत्यंत कमी कालावधीत २० टक्के आर्थिक मोबदला देऊ, असे सांगितले होते. नलावडे यांनी मे २०२१पासून फेब्रुवारी २०२२पर्यंत १९ लाख ५० हजार रुपये त्यांच्या हवाली केले. त्यानंतर शंकर गायकवाड हा नलावडे यांना टाळू लागला. नलावडे याना सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाड्या घेतल्या नाहीत, असा संशय आल्याने त्यांनी पैसे परत मागितले. त्यांनी दिलेले धनादेशही खात्यात पैसे नसल्याने परत गेले. नंतर ते घर व दुकान बंद करुन पळून गेले. त्यानंतर नलावडे यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार गायकवाड दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठ्या अधिकाऱ्यांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंधपोलीस खात्यात मोठ्या अधिकाऱ्यांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध असून, नोकरीला असल्याने उधारी पाधारीचा काहीएक त्रास होत नाही. पोलीसच आमच्या गाड्या वापरतात, असे सांगून गायकवाड दाम्पत्याने मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून आपण, कोणाकोणास त्रास देऊन पैसे कसे वसूल केले, याची माहिती फिर्यादी नलावडे यांना दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.