पुणे ग्रामीण स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
बारामती : जनावरे चोरी प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या आरोपीला पाहुणेवाडी, ता. बारामती येथे ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षकांनी रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. १६) पथकाला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरारी असलेला आरोपी महादेव ऊर्फ भावड्या सुरेश जाधव (वय २८, धंदा मजुरी, रा. ढवळे मळा, खांडज, ता. बारामती, जि. पुणे) हा पाहुणेवाडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी करून त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे, स्वप्निल आहिवळे यांनी ही कारवाई केली.