प्रसाद कानडेपुणे : रेल्वेत सामान चोरीला गेले, मारहाण झाली, महिलांचे दागिने लुटले यासाठी प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडून तक्रार देण्यासाठी आरपीएफ, जीआरपी (लोहमार्ग पोलीस) कडे जाण्याची गरज नाही. रेल्वे प्रशासनाने ‘रेल सुरक्षा’ हे नवीन ॲप विकसित केले आहे. यावर प्रवाशांना तत्काळ तक्रार देता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. शिवाय, तक्रारीसाठी होणारी चालढकल देखील थांबणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने तयार केलेले ‘रेल सुरक्षा’ ॲप लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. हे ॲप विकसित करताना आरपीएफ व जीआरपी यांच्या यंत्रणेशी कनेक्ट केले आहे. शिवाय संबंधित राज्याच्या पोलीस यंत्रणेशी देखील हे जोडण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेत एखादा गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ माहिती संबंधित राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांपर्यंत पोहचणार आहे. एखादा गुन्हा करुन आरोपी सहजपणे दुसऱ्या राज्यातील स्थानकावर उतरून पळून जातात. नवे ॲप देशातील सर्व राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून जाणाऱ्या आंतरराज्य आरोपीला पकडणे सोपे होईल.
रेल सुरक्षा ॲप विकसित केले असून लवकरच ते प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. यामुळे रेल्वेतील गुन्ह्याचा तपास लवकर होईल. गुन्ह्याचे देखील प्रमाण घटेल.- अजय सदानी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, मुंबई