बारामती: मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील फरार आरोपीला बारामती शहरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचत राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.
पांडे हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम पाहतो. पांडे व त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईत कोविडची लस असल्याचे भासवून भेसळयुक्त द्रव्य नागरिकांना दिले होते. वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलची प्रमाणपत्रे नागरिकांना देऊन फसवणूक केली होती. तो पुणे, बारामती परिसरात असल्याचा संशय कांदिवली पोलिसांना होता. कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्याला दिली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याने स्वतंत्र पथक तयार करत भिगवण रस्त्यावरील अमृता लॉजमधून पांडे याला अटक केली. आरोपी हा उच्चशिक्षित आणि हुशार असल्याने पोलिसांनी दक्षता घेत सापळा रचत त्याला शिताफीने अटक केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, कांदिवलीत दाखल असलेल्या या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. ३० मे २०२१ रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत प्रत्येकी एक हजार २६० रुपये घेत कोरोनाची लस म्हणून वेगळेच द्रव्य लोकांना टोचले होते. ३९० जणांना ही लस देण्यात आली होती. या प्रकरणात आजवर कांदिवली पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फसवणूक करत जमा केलेली १२ लाख ४० हजारांची रक्कम जप्त केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे यास आता बारामती पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि मुकुंद पालवे, अंमलदार नवनाथ शेंडगे, सचिन कोकणे यांनी ही कामगिरी केली.
मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली.
०१०६२०२१ बारामती—०६