पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांना शासन सेवेमध्ये परत पाठवण्याच्या केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न केल्याने आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ झाला. संतप्त सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अखेर दत्तात्रेय मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. या सोबतच सौरदिव्यांची दुरूस्ती न करता काढण्यात आलेली बिले, महिला बालकल्याण विभागाने चिक्की खरदेसाठी ठेवलेली रक्कम, तसेच वेल्हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागेवरून जिल्हा परिषदेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. यामुळे सभागृहाचे कामकाजही काही काळ ठप्प झाले होते.
जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंर्वधन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सुरेखा पानसरे, उतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सर्व पक्षाचे गटनेते व सदस्य व विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते.
गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मुंडे यांना शासन सेवेत परत पाठवण्याचा ठराव सर्वानुमते झाला होता. परंतु या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आज तहकूब सभेमध्ये या प्रश्नावर सदस्य आक्रमक झाले. ठरावाची अंमलबजावणी न करणे हा सभागृहाचा अवमान आहे. याबद्दलचे नियम काय? अशी विचारणा शिवसेना गटनेते देविदास दरेकर भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे यांनी केली. यामुद्यावरून वातावरण तापले. अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे प्रशासनाला जाब विचारत याचा खुलासा करण्यास सांगितले. तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे म्हणाले, मुंडे यांच्या बद्दल सभेमध्ये झालेली चर्चा आणि निर्णयाप्रमाणे शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची तरतूद आहे परंतु विभाग प्रमुखाच्या संदर्भात असे स्पष्ट नसल्याचे त्यांनी नमूद केले तेव्हा सदस्य आक्रमक झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या अधिकारातच कारवाई करायला हवी. मुंडे यांचा पदभार काढून घ्या, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. अशी जोरदार मागणी केली. अखेर अध्यक्ष निर्मला पानसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे आज सभेत उपस्थित नाही उद्या त्यांनी मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.
चौकट
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बसवलेल्या सौर पथदिव्यांची दुरुस्ती न करताच बिले दिले आहेत. दुरुस्तीसाठी पथक नेमले होते, मात्र त्यांनी दुरुस्तीच केली नाही. आमच्याभागातील दिवे बंदच असल्याचा आरोप सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर सर्व साधारण सभेत केला. गटनेते शरद बुट्टे-पाटील म्हणाले, सौर दिवा बंद पडला तर ग्रामपंचायतला कुणाला फोन करावा हे समजत नाही, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दिवे पुरवणाऱ्या कंपनीचा संपर्क दिला पाहिजे. तर सदस्य आशा बुचके म्हणाल्या, आमच्या भागात देखील सौर दिवा दुरुस्तीसाठी गाडी आलेली नाही. यावर कृषी अधिकारी अनिल देशमुख म्हणाले, ठेकेदाराकडून सगळे दिवे दुरुस्त करून घेतल्याशिवाय अनामत रक्कम देणार नाही.