काँग्रेस भवनसमोर जमाव गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा नाेंदवा; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:47 AM2024-07-05T08:47:42+5:302024-07-05T08:47:56+5:30
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहर पोलिस उपायुक्त संदीपसिंह गील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले....
पुणे :काँग्रेस भवनसमोर जमाव जमवून विनाकारण गोंधळ घातला आणि सार्वजनिक शांतता बिघडवली, या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहर पोलिस उपायुक्त संदीपसिंह गील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शिंदे यांनी सांगितले की, घाटे भाजपचे शहराध्यक्ष झाल्यापासून ते वारंवार शहराची शांतता, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरून घाटे यांनी शहरात माध्यमांसमोर अनेक प्रक्षोभक विधाने केली. राहुल गांधी नक्की काय म्हणाले? त्यांनी कोणाला हिंसक म्हटले? याची कोणतीही माहिती न घेता घाटे यांनी त्वरित काँग्रेस भवनसमोर गोंधळ घातला. त्यांची ही कृती आततायीपणाची आहे. त्यांचे वर्तन सातत्याने शांतता बिघडविणारे असेच आहे.
राजकीय वशिल्याने संरक्षण मिळवून ते पोलिस बंदोबस्तात फिरत असतात. काँग्रेस भवनसमोर त्यांनी गुरुवारी जे काही केले ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे होते. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचे शिंदे यांनी सांगितले.