पिंपरी : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, त्याचा वापर करून विटंबनात्मक लेखन केल्याप्रकरणीही केतकी चितळे हिच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप नितीन गोपाळ मोरे (वय ५७, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री केतकी चितळे हिने ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून सोशल मीडियावर वादग्रस्त व विटंबनात्मक लेखन केले. फिर्यादीने हे आक्षेपार्ह लेखन सोशल मीडियावर पाहिले. संत तुकाराम महाराज हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. तसेच ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. संत तुकाराम महाराजांना जगदगुरू म्हटले जाते. केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराजांच्या नावाचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लिखाण केले असल्याने वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
आक्षेपार्ह लिखाण केल्याने एकावर गुन्हा-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लेखन केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. आशिष सुभाष बंसल (वय ४१, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १५) फिर्याद दिली. त्यानुसार सोशल मीडियावरील निखील भामरे नावाच्या अकाउंटधारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून आक्षेपार्ह लिखाण केले. वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची, अशी शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक व जीवे मारण्याच्या धमकीचा मजकूर असलेली पोस्ट केली. राजकीय पक्षामध्ये द्वेषाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.