चाकण (पुणे) : औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी येथील माथाडी कामगारांवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. माथाडी कामगारांच्या संदर्भात एकाच महिन्यात हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
अभिजित धनंजय कुलकर्णी (वय ४१, रा. तळेगाव दाभाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माथाडी कामगार प्रभाकर तळेकर, कृष्णा चौधरी, राजेश गुळवे, गणेश जाधव, मोहन थोरवे, प्रसाद कदम, स्वप्निल टेमकर, बाळासाहेब गाढवे, संजयनाईकरे, प्रशांत तळेकर, नंदकुमार वायाळ, नवनाथ खंडाळगे, मोहन बोंबे, सोमनाथ बोंबे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीमधील खराबवाडी येथील टोल इंडिया लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत (ऑक्टोबर २०२१ पासून ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत) पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाच्यामार्फत टोळी क्रमांक ४०१ मधील एकूण १४ नोंदणीकृत माथाडी कामगारांनी अनलोडिंगकरिता येणारे ट्रान्स्पोर्ट ड्रायव्हर यांच्याकडून नियमबाह्य पैशाची वसुली केली आहे. हे माथाडी कामगार वाहनातील माल खाली करण्यासाठी नियमबाह्यपणे मोबदला रक्कम म्हणून रोख किंवा गुगल पेच्या माध्यमातून प्रत्येक गाडीमागे २०० ते ३०० रुपये या प्रमाणे दररोज येणाऱ्या गाड्यांपैकी ५ ते १० गाड्यांच्या चालकांच्याकडून सक्तीने पैशाची वसुली करत होते. महिन्याला २५ हजार ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मोठी रक्कम खंडणी स्वरूपात वसूल केली जात होती. एकूण खंडणी स्वरूपात ४ लाख ते ६ लाख रुपये खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस करत आहेत.