पुणे : पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून महाआरती करुन दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे (milind ekbote) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिलिंद एकबोटे यांनी तेथे बांधकाम सुरु असल्याचा दावा करुन पोलीस संबंधितांना पाठीशी घालत आहेत. पोलिसांनी आमचे २ प्रतिनिधी व त्यांचे २ प्रतिनिधी घेऊन पाहणी करावी, असा सांगितले.
सुनिल सदाशिव तांबट (वय ५३, रा. कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक (वय ३६, रा. गुरुवार पेठ) मुकुंंद मारुतीराव पाटोळे (वय ६२, रा. मंगळवार पेठ), मिलिंद रमाकांत एकबोटे (वय ६५, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), नंदकिशोर रमाकांत एकबोटे (वय ६०, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर (वय ४१, रा. शुक्रवार पेठ), कुणाल सोमेश्वर कांबळे (वय ३९, रा. नवी सांगवी), रवींद्र राजेंद्र ननावरे (वय ३३, रा. पर्वती दर्शन), संतोष कमलाकर अनगोळकर (वय ४४, रा. धनकवडी), धारुदत्त वसंत शिंदे (वय ५२, रा. सहकारनगर), धनंजय मारुती गायकवाड (वय ५१, रा. सदाशिव पेठ), प्रशांत प्रकाश कांबळे (वय २४, रा. मंगळवार पेठ), देवीसिंग मोहनसिंग दशाना (वय १८, रा. कसबा पेठ), विकी रमेश चव्हाण (वय २५, रा. कसबा पेठ), आदित्य ज्ञानेश्वर कांबळे (वय १८, रा. कसबा पेठ), विश्वजीत ज्ञानदेव भिसे (वय २३, रा. हमालनगर, मार्केटयार्ड), आकाश प्रभाकर माने (वय १९, रा. चव्हाणनगर, पद्मावती), पार्थ जय प्रकाश पांचाळ (वय २१, रा. नर्हे), आदित्य संतोष राजपूत (वय १८, रा. पद्मावती) आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
काय आहे नेमके प्रकरण-
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध समाजमाध्यमांवर सुनियोजितरित्या कट रचून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ होणारे मजकूर असलेले संदेश, व्हिडिओ व निमंत्रण पत्रिका या सोशल मीडियावर प्रसारीत करुन सर्व हिंदु धर्मीय लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांना पवळे चौकात एकत्र जमवले. तेथे महाआरती केली. पोलीस सह आयुक्त यांनी जारी केलेल्या कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. तसेच कार्यक्रमस्थळी वाटप केलेल्या पुस्तिकेमध्ये येथील विवादित ठिकाणी न्यायालयाची स्थगिती असून कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नसताना तेथे काम चालू असल्याबाबत दिशाभूल व दोन समाजामध्ये तेढ, द्वेष निर्माण व्हावा, या उद्देशाने मजकूर छापलेला आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत मिलिंद एकबोटे यांनी सांगितले की, संबंधितांनी पुण्येश्वर मंदिरासंबंधी पुरावे नष्ट केले आहे. ५ मजली इमारतीचे काम सुरु केले आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी हे काम सुरु आहे. पोलीस त्यांना अडवत नाही, असा दावा केला आहे.