जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, तसेच प्रमुख राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास गर्दी जमविल्याचे आरोपावरुन बाजार समितीच्या सभापती, तीन संचालक आणि प्रशासकीय सचिव यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन विजय शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ सप्टेंबर रोजी सुवर्णमहोत्सव निमित्ताने शेतकरी मेळावा व व शिवाजीराव काळे यांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. साथरोग प्रतिबंधक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन करून या कार्यक्रमात गर्दी जमविल्याप्रकरणी सभापती अॅड. संजय काळे, संचालक दिलीप डुंबरे, धनेश संचेती, निवृत्ती काळे व सचिव रुपेश कवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.