पुणे : जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नसताना तिच्या नोंदीला हरकत घेऊन १५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणात पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह दोघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदाम ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे याला अटक करण्यात आली असून देवेंद्र जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय २६, रा. कामठे मळा, फुरसुुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन बहिरट यांचे आजोबा सदाशिव कामठे यांनी शेवाळवाडी येथील जमीन नोव्हेंबर २०१५ मध्ये विक्रीसाठी काढली होती. त्याचा संजय हरपाळे यांच्याबरोबर व्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सदाम कामठे याने माझ्यामार्फतच व्यवहार करायचा. नाही तर व्यवहार होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा भितीपोटी कामठे याला हरपळे यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले.तरीही या व्यवहाराची नोंद ७/१२ वर होऊ नये, म्हणून त्याने हरकतीचा अर्ज करुन सदाशिव कामठे व हरपळे यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली. त्यातील ५ लाखांचा धनादेश घेतला. त्यानंतर त्याने हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची मागणी करुन काहीही संबंध नसताना १५ लाख रुपये घेतले. या जमिनीबाबत देवेंद्र जैन यांनी अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा वगैरे खोट्या बातम्या गेल्या वर्षी देऊन बदनामी केली. मोहन बहिरट हे या मिळकतीवर गेले असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. बहिरट यांच्या फिर्यादीनुसार सदाम कामठे याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
जमीन व्यवहाराला हरकत घेऊन खंडणी उकळल्याप्रकरणी देवेंद्र जैनसह दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:55 AM
या जमिनीबाबत देवेंद्र जैन यांनी अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा वगैरे खोट्या बातम्या देऊन बदनामी केली.
ठळक मुद्देफिर्यादी मिळकत जमिनीच्या ठिकाणी गेले असता जिवे मारण्याची धमकी