पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. या पोस्टमुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते व पवार यांना मानणारे सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यात नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. केतकी चितळे हिने या पोस्टमधून ब्राम्हण व इतर समाज यामध्ये द्वेषाची भावना, तेढ व वैमनस्य निर्माण करण्याची जाणीवपूर्वक कृत्य केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, समीर शेख, उदय महाले, गणेश नलावडे, प्रीती धोत्रे, ॲड. विकास शिंदे आदींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली होती.