पुणे: कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकबोटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पुणे शहरात असणारा मुस्लिम बहुल भाग म्हणून कोंढवा ओळखला जातो. याठिकाणी हज हाऊस बांधण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु या हाऊसला एकबोटे यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवप्रेमींनी एकबोटेंच्या आमिषाला बळी पडू नये... मिलिंद एकबोटे यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. यामुळे दंगल होण्याची शक्यता आहे. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तरी आम्ही तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की एकबोटे यांच्या आमिषाला बळी न पडता शांतता राखावी. आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
..............................
समस्त हिंदू महानगरपालिकेचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही याबाबत मिलिंद एकबोटे म्हणाले, कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महानगरपालिकेने चालू केले आहे. ते अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल असा अतिशय घाणेरडा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेने जनतेच्या विकासासाठी जो पैसा खर्च होणे अपेक्षित आहे, तो पैसा हज हाऊसच्या बांधकामासाठी खर्च करायचा ठरवलेला आहे. चार कोटी रुपये महापालिका प्रशासनातर्फे हज हाऊससाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ॲमिनिटी स्पेसमध्ये सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हज हाऊसचे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांनी शोधून काढली आहे.
.........................
सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार, प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम करता येणार नाही. परंतु सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता घेऊन धूळफेक करून महानगरपालिका प्रशासनानेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे. समस्त हिंदू आघाडी आपली ताकद पणाला लावेल. समस्त हिंदू आघाडी कदापि महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस निर्मितीचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही.- मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू आघाडी