बारामती : फळविक्रेत्यांची अवाजवी रक्कमेचा नोटरी करारनामा करत फसवणुक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह सहाजणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी(दि २७) फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करत फसवणूक केल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यासह सहाजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाजीद छोटु बागवान(वय ५५, रा.म्हाडा कॉलनी,बारामती) या असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. त्यानुसार आरोपी राहूल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझीरकर, संगीता हनुमंत नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर (सर्व रा. शिरवली, ता. बारामती) सतीश भिकाराम वायसे (रा.अंजनगाव, ता. बारामती), गुलाब देना धावडे (रा. सोमंथळी, ता. फलटण,जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम ४१७,४६८, ४७१, ४७७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०११ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी बागवान यांनी आंबा व चिककु शिवाय कोणतेही फळे घेतली नाहित. त्यासाठी चिक्कु व आंबा खरेदीच्या व्यवहारापोटी केवळ प्रत्यक्षात फक्त १ लाख २५ हजार रुपये दिले.मात्र, त्यांच्याशी ७४ लाख ४० हजार रुपयांची अवाजवी रक्कम स्टॅम्पवर ,नोटरी व करारनामा करुन बागवान यांच्यासह इतरांची फसवणुक केली. याशिवाय अन्य फळ विक्रेते असणारे इरफान युनुस बागवान यांच्या नावे ३ लाख ५० हजार, युनुस शेखलाल बागवान यांच्या नावे १ कोटी ८३ लाख, मोहंमद शेरीफ बागवान यांच्या नावे २९ लाख असा २ कोटी ९० लाख ७३ हजार रुपयांचा स्टॅम्पवर नोटरी करारनामा करत चौघांची फसवणूक करण्यात आली आहे.
फिर्यादी शहरातील गुणवडी चौकात फळांचा स्टॉल लावुन विविध फळांच्या विक्रीचा व्यवसाय करतात.त्यासाठी ते येथील मार्केट यार्ड मधुन होलसेल दरात फळे आणतात. सन २०११ साली फिर्यादी मार्केट यार्ड येथे फळे आणण्यासाठी गेले होते. यावेळी तोंडओळख असणाऱ्या राहूल खोमणे याने पणदरे खिंड येथील बागेतील चिक्कू तुम्हाला १५ रुपयांऐवजी १२ रुपये किलो दराने देतो, असे सांगितले.सुरवातील ५०० फिर्यादीने त्यांच्याकडून पणदरे खिंड येथील बागेतुन दोन दिवसात दोन वेळा ५०० किलो चिक्कु खरेदी केला.त्यानंतर पाच सहा महिन्यांनी त्यांच्या आंबा खरेदीचा व्यवहार झाला. चिक्कू व आंबा खरेदी एकुण व्यवहार १ लाख २५ हजार रुपयांचा झाला होता. त्यापोटी फिर्यादीने दिलेले तीन चेक त्याने माघारी देण्यास टाळाटाळ केली,आजअखेर ते चेक परत मिळालेले नाहित. चिकु विक्रीनंतर एक दोन दिवसांनी आरोपी खोमणे दुचाकीवर आला.यावेळी त्याने १०० रुपयांच्या स्टँपवर काहीतरी लिहुन आणले.
फिर्यादी बागवान यांनी त्यांना वाचता येत नसल्याने त्यास याबाबत विचारणा केली. उलट फळे विक्रीचा मोठा व्यवसाय करतो,मला हिशोब ठेवावा लागतो अशी बतावणी करीत फिर्यादीसह अन्य फळ विक्रेत्यांकडून करारनामा करून घ्यायचा असल्याचे सांगत १०० रुपयांच्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये राहूल खोमणे याने फियार्दीच्या घरी येत आपले यापूर्वी स्टॅम्पवर झालेल्या व्यवहारासंबंधी कोणी तुमच्याकडे चौकशीकरीता आले तर झालेला व्यवहार खरा आहे, असे सांगुन स्टँप देवुन निघुन गेला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाझीरकर यांच्या चौकशीच्या अनुषंगाने फियार्दी व इतर विक्रेत्यांकडे चौकशी सुरु झाली असता त्यांना आपल्या नावे सुमारे २ कोटी ९० लाखांचा करारनामा झाला असल्याचे लक्षात आले. फियार्दीने या करारनाम्याची प्रत पाहिली असता आरोपींकडून लाखोंच्या रकमेत नारळ,जांभुळ,कलींगड,खरबुज,चिक्कु आदी फळे खरेदी करण्यात आल्याचे करारनाम्यात नमूद केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आली आहे.त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या फळ विके्रत्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.------------------------------... मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत... बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आजवर तीन गुन्हे दाखल झालेल्या हनुमंत नाझीरकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहित. नाझीरकर त्यांच्या पत्नीवर पुणे, बारामती व अन्य ठिकाणी नऊ तर मुलीवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या चार झाली आहे. ——————————————————