पुणे : महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अलका टॉकिजजवळील टिळक चौकात बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपूरे, सुशिल मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह ४० ते ५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी टिळक चौकात रविवारी आंदोलन केले होते. विनापरवाना एकत्र जमून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेश असताना त्याचे उल्लंघन करुन कोरोना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता जाणून बुजून आपल्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य करुन शासनाच्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यासाठी बेकायदेशीरपणे गर्दी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.