राज ऊर्फ कैलास महेश गणात्रा (वय ४७, रा. ग्राफिकॉन पॅराडाईज, साळुंखे विहार रोड, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमाेल कंडोई आणि सिद्धार्थ शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी गणात्रा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. २५ ऑक्टोबर रोजी गणात्रा याचा वाढदिवस होता. त्यामुळे फिर्यादी त्याला भेटायला त्याच्या कोंढव्यातील घरी गेल्या होत्या. त्यावेळी अमोल कंडोई व सिद्धार्थ शेट्टी हेही तेथे होते. आरोपींनी फिर्यादीच्या समोर कपडे काढून नाचायला सुरुवात केली. त्यांचे गाल ओढून अश्लिल वर्तन केले. त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी विरोध करताच जातीवाचक शिवीगाळ केली.
या प्रकारामुळे फिर्यादी या प्रचंड घाबरल्या. त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली. या घटनेच्या त्यांना मोठा धक्का बसला. त्या आजारी पडल्या होत्या. त्यातून बरे वाटल्यानंतर शनिवारी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गणात्रा याला अटक केली आहे.
या गुन्ह्यात अनुसुचित जाती प्रतिबंधक कलम (ॲट्रोसिटी) वाढविण्यात आले असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आहे.