पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात लागू असलेली जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांच्यासह ५८ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहा ते सव्वा बाराच्या दरम्यान आंदोलन केले होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व त्यांच्या साथीदारांनी शहरात लागू असलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घोषणाबाजी केली. उंब-या गणपती चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान लक्ष्मी रोडवर रांका ज्वेलर्स दुकानासमोर एकत्र जमा होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, अशी कृती केली. यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या वतीने पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.