लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विकसन करार केला असताना जमिनीबाबत वाद निर्माण करण्यासाठी दुसऱ्याच्या नावाने खरेदीखत करुन ३० कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हिरानंदानी प्राॅपर्टीजच्या वतीने हेमंत बागारेड्डी मोटाडू (वय ५८, रा. ईस्ट स्ट्रीट, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अली अकबर जाफरी (रा. नेपियन रोड, कॅम्प) आणि वनेसा डोनाल्ड डिसुजा (रा. महात्मा गांधी रोड, कॅम्प) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली जाफरी याने २००५ मध्ये चऱ्होली येथील जमिनीबाबत विकसन करार केला होता. तसेच त्यांनी निरंजन हिरानंदानी यांना २४ जानेवारी २००५ रोजी लिहून दिली. असे असताना जमिनीबाबत वाद निर्माण करण्यासाठी त्यांनी डिसुजा यांच्या नावे खरेदी खत तयार केले. त्यानंतर जमिनीबाबत लिटीगेशन निर्माण केले. याबाबतचा वाद मिटवून टाकू असे सांगून फिर्यादी यांना १६ जुलै २०२१ रोजी कॅम्पमधील कोहिनूर हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे त्यांच्याकडे ३० कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास नुकसान करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. त्यावरून लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करीत आहेत.