घोडेगाव : विनयभंग केल्याप्रकरणी तीन विद्यार्थिनींच्या तक्रारी वरून येथील महाविद्यालयातील प्राध्यापकावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत पांडूरंग साळवे असे त्या प्राध्यापकाचे नाव आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्राध्यापक महाविद्यालयात मराठी विषय शिकवतो. त्याने एम.ए.च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना काही दिवसांपूर्वी ‘अश्लील शिव्यांचा प्रकल्प’ करण्यास सांगितले होते. सदर प्रकल्प पूर्ण न केल्यास नापास करण्याची धमकीही दिली होती. भीतीपोटी काहींनी हा प्रकल्प केला, तर काहींनी त्याला विरोध केला. ज्यांनी प्रकल्प पूर्ण केला नाही, त्यांना वारंवार विचारणा करून मानसिक छळ करत होता. यामध्ये विद्यार्थिनींच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन त्याने वेळोवेळी केले. या प्राध्यापकाच्या सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी पुढे येऊन घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला महाविद्यालयात जावून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्राध्यापकावर कठोर शासन व्हावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी घोडेगाव शहरातून व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. या गुन्ह्याचा तपास खेड उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहेत. (वार्ताहर)
विनयभंग प्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा दाखल
By admin | Published: August 26, 2014 5:10 AM