आळंदी: ग्रामीण रुग्णालय शिपाई वर्ग चार पदासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांच्या बनावट सहीचे नियुक्ती पत्र देणाऱ्यांचे पितळ आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ ऊर्मिला शिंदे यांनी उघडे केले आहे. बोगस नियुक्ती पत्राद्वारे जवळपास बावीस जणांची फसवणूक झाली असून त्यांना जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयाचे नाव टाकून नियुक्ती पत्र दिले होते. दरम्यान, सर्व बोगस नियुक्ती पत्रे इंदापूरमधील निलंबित शिपायामार्फत एक लाख प्रत्येकी पैसे घेऊन दिल्याची कबुली बोपोडी (पुणे) येथील एका तीस वर्षीय युवकाने दिली आहे. अधिक माहिती आळंदी पोलिसांकडून घेतली जात आहे. नियुक्ती पत्र दिलेल्यांमध्ये चार-पाच लोक नगर जिल्ह्यातील भिंगार येथील असून त्यांना यवत, जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे नियुक्तीचे पत्र दिले आहे. दरम्यान, आळंदी ग्रामीण रुग्णालय शिपाई पदासाठी बोपोडीतील युवकाकडून एक लाख रुपये घेतले. आणि जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांच्या खोट्या सहीचे नियुक्तीपत्र (दि. १५) रोजी नगर जिल्ह्यातील भिंगार येथे दिले.
बुधवारी (दि.१६) हे पत्र घेऊन युवक आळंदीत आल्यावर येथील डाॅ. उर्मिला शिंदे यांनी सही बनावट असल्याचे ओळखले. ही रिक्त जागा आळंदी ग्रामीण रुग्णालयात नाही. शंका आल्याने डाॅ. शिंदे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांना या प्रकाराची कल्पना दिली. तसेच आळंदी पोलिस ठाण्यालाही योग्य त्या कारवाई करण्याबाबत पत्र दिले. शुक्रवारी (दि.१८) आळंदी पोलिस ठाण्यात बोपोडीतील युवकाचा जबाब घेण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. एस. यमपल्ले यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पत्र पाठवून कुणालाही रुजू करून न घेणे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.