विवेक भुसे
पुणे : सायबर चोरटे लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना कोट्यवधींचा गंडा घालत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याची तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यास हे पैसे गोठवून चोरट्यांनी लांबविलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. सायबर क्राईमच्या भाषेत गोल्डन अवरमध्ये तक्रार केल्यास अगदी १०० टक्के पैसे मिळू शकतात. या वर्षी १२ डिसेंबरपर्यंत तब्बल ५९८ प्रकरणांत सायबर पोलिसांनी ३ कोटी ४० लाख ५६ हजार ७२६ रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. त्यात जानेवारी २०२१ मध्ये सर्वाधिक ५८ प्रकरणांत तक्रारदारांना ४३ लाख ५८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. सायबर पोलिसांनी गेल्या वर्षी २०२० मध्ये ८२२ प्रकरणांत ९ कोटी २८ लाख रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिले होते.
तत्काळ तक्रार केल्याने मिळाले सर्व ३ लाख
दुबईतील हॉस्पिटलमध्ये नाेकरी लावतो, असे आमिष दाखवून रजिस्टेशन फी म्हणून १० रुपये भरावे लागतील, असे सांगून तरुणाला लिंक पाठविली. त्यावरील ॲप डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून ३ लाख ७ हजार २१४ रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले होते. त्यांनी तातडीने तक्रार करताच सायबर पोलिसांनी सर्व पैसे परत मिळवून दिले.
फसवणूक झालेल्यांसाठी हेल्पलाईन
पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दररोज साधारण ३० ते ३५ तक्रारी येत असतात. त्यात केवळ ऑनलाईन फसवणुकीच्या दररोज सरासरी १२ ते १३ तक्रारी येत असतात. दरवर्षी या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. अनेकदा तक्रारदार हे फसवणूक झाल्यानंतर खूप वेळाने पोलिसांशी संपर्क साधतात. जर तक्रारदारांनी फसवणूक झाल्याचे समजताच त्वरित संपर्क साधला तर सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने त्यावर कारवाई करून ज्या ठिकाणी हे पैसे गेले, त्या मर्चंट बँकेला सांगून ते पैसे गोठवून ठेवू शकतात.
या क्रमांकावर साधा संपर्क
त्यासाठी यदाकदाचित तुमची फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्याच्या हेल्पलाईन क्रमांक ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून केले आहे.
''नागरिकांनी गाेपनीय माहिती कोणाला देऊ नये. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने सायबर पोलीस ठाण्याच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. सायबर पोलीस त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असे पुणे सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.''