पुणे : नाना पेठेतील मॉर्डन रुग्णालयाने बिलाच्या खर्चाचे अंदाजपत्रक रुग्ण दाखल असल्याचे दाखवून रुग्णाच्या नावाचे हमीपत्र मिळविण्याबरोबरच शहरी गरीब योजनेच्या चुकीच्या रुग्णाच्या खोट्या फाईल बनवून महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी डॉक्टरविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडील शहरी गरीब साहाय्य योजना आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी करण्याकरिता महापालिकेच्या पथकामार्फत रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी मॉर्डन रुग्णालयाच्या नावे मागील सुमारे १० दिवसांमध्ये दिलेल्या १० हमीपत्रांपैकी फक्त ३ रुग्णांच्या नोंदी आयपीडी रजिस्टरमध्ये आढळून आल्या नाहीत. रुग्णालयाने ॲडमिट नसलेल्या रुग्णाच्या नावाने बिलाच्या खर्चाचे अंदाजपत्रक रुग्ण दाखल असल्याचे दाखवून रुग्णाच्या नावाचे हमीपत्र आरोग्य विभागाकडून मिळविले असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णावर न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल देखील आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आले असल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाला दूरध्वनी करून खात्री केली असता ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून डॉक्टरांनी अधिकाराचा गैरवापर करीत गरीब योजनेच्या चुकीच्या रुग्णाच्या खोट्या फाईल बनवून महापालिकेची फसवणूक केल्याचे दिसून आल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एम. डी. जाधव करीत आहेत.