लोणी काळभोर (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाक्याजवळील गुलमोहर लॉन्ससमोरील शनिवारी (दि. १८) कोसळलेल्या होर्डिंग घटनेत कार्यालय मालकांसमवेत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अंमलदार अजिंक्य जोजारे (वय २९, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार गुलमोहर लॉन्सचे मालक शरद ज्ञानेश्वर कामठे, (जागामालक, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले (रा. खराडी पुणे) व बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलमोहोर लॉन्ससमोरील पार्किंगजवळ असलेले होर्डिंग उभारण्याचे व जाहिराती बदलण्याचे काम सम्राट ग्रुपचे संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांना देण्यात आले होते. शनिवारी झालेल्या वादळी पावसाने हे होर्डिंग कोसळून दोनजण जखमी झाले होते.
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे होर्डिंग्ज सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता, स्ट्रक्चरल ऑडिट न करता व कमकुवत लोखंडी सांगाडा रचून नागरिकांचे जीवितास धोका निर्माण होईल, असे बांधण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.