- किरण शिंदे
पुणे : ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध पेठे ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवून पेठे ज्वेलर्सच्या मालकांनी एका व्यक्तीकडून तब्बल 60 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यानंतरही नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या न देता त्या व्यक्तीची फसवणूक केली. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग चंद्रकांत पेठे (रा. ११०२/बी, कपिल वास्तू, कर्वेनगर) आणि तनय पराग पेठे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेला दोघांची नावे आहे. भादंवि ४२०, ४०६, ३६ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र विनोदचंद्र शहा (वय ४९, पर्वती) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील आयडियल कॉलनी परिसरात पेठे ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सचे मालक पराग पेठे आणि तनय यांनी फिर्यादी यांना कमी भावात नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून रोख २५ लाख आणि आरटीजीएसद्वारे ३५ लाख असे साठ लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांच्यात स्टॅम्प पेपरवर करार देखील झाला आहे. मात्र असे असतानाही आरोपींनी फिर्यादी यांना कराराप्रमाणे नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या दिल्या नाहीत.
फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाळ केली. फिर्यादी यांनी पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावला असता पराग पेठे यांनी दहा लाख रुपये दिले. उर्वरित पन्नास लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. त्यामुळे विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करत आहे.