Pune Porsche Car Accident:पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांची हत्या केली होती. या अपघातानंतर अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि आजोबांना विविध गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. कोर्टानं अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. दुसरीकडे या प्रकरणानंतर एक रॅप साँग समोर आलं होतं. सुरुवातीला अल्पवयीन आरोपीने हे तयार केल्याचे म्हटलं जात होतं. मात्र ते दुसऱ्याच कोणीतरी तयार करुन व्हायरल केलं. आता पोलिसांनी रॅप साँग करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी पोर्श अपघातावर रॅप साँगचा कथित व्हिडिओ बनवणाऱ्या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आरोपीने जामीन मिळाल्यानंतर हा व्हिडीओ तयार केल्याचे सुरुवातीला म्हटलं जात होतं. मात्र आरोपीच्या आईने हा आपल्या मुलाचा व्हिडीओ नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये आयपीसीच्या कलम ५०९, २९४बी आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला.
कार अपघातातून तो कसा वाचला याचा दावा करणारे रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ण पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ते बनावट खाते होते आणि व्हिडिओमध्ये आरोपीची कोणतीही भूमिका नव्हती. त्यानंतर पोलिसांनी आता इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ टाकणाऱ्या शुभम शिंदे आणि रॅपर आर्यन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुणे अपघातातील आरोपीला बालसुधारगृहात पाठवल्यानंतर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. यामध्ये एक मुलगा रॅप करताना दिसत होता. “कुछ सुनोगे, करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे, सामने आया कपल मेरे अब वो है नीचे. साउंड सो क्लीशे, सॉरी गाड़ी चढ़ गई आप पे, १७ की उम्र पैसा खूब मेरे बाप पे, एक दिन में मिल गई मुझे बेल, फिर से दिखाऊंगा सड़क पर खेल," असे या रॅप साँगमध्ये एक तरुण म्हणत होता. हा व्हिडिओ शेअर करताना हा तोच मुलगा आहे ज्याने १९ मेच्या रात्री दोन जणांची हत्या केली होती, असं म्हटलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच रोष वाढला. मात्र आरोपीच्या आईने याबाबत स्पष्टीकरण देत हा आपला मुलगा नसल्याचे म्हटलं होतं.