माळेगाव : नगरपंचायतीत सेवाज्येष्ठता डावलून नव्या व परगावच्या कामगारांना सेवेत कायम केल्याप्रकरणी कामगारांच्या पत्राची दखल घेत प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
बारामती तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या माळेगावचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी संजीवकुमार मारकड व ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे हे पाहत होते. प्रशासकीय कालावधीत सेवाजेष्ठता डावलून काही नवख्या व परगावच्या लोकांना सेवेत कायम करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रशासक तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रशासकांनी नगरपंचायत कार्यालयात भेट देऊन सर्व कामगारांशी साधकबाधक चर्चा केली. कामगारांनी आपल्या समस्या सांगितल्या. या वेळी प्रशासकांनी दफ्तर तपासणी केली. दरम्यान प्रशासकीय काळात स्मशानभूमी सुशोभीकरण, दिवाबत्ती, समाज मंदिरात, वृक्षसंवर्धन आदी कामात आर्थिक अनियमितता आढळून येत आहे. ठेकेदारीच्या नावाखाली अनेकांच्या नावे चेक काढण्यात आले आहेत. या सर्व बाबी माजी सभापती संजय भोसले, माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे, ज्येष्ठ नेते दीपक तावरे यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून देऊन सखोल चौकशीची मागणी केली.
—————————————
कामगार भरती प्रकरण व आर्थिक अनियमितता याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे सादर करण्यात येईल नगरपंचायत आकृतिबंध मंजूर झाल्यावरच कामगार भरती करण्यात येईल.
विजय पाटील, प्रशासक तथा तहसीलदार
————————————————
जुन्या कामगारांचा विचार न करता मनमानी पद्धतीने नव्या कामगारांची भरती करणे चुकीचे आहे. या प्रकाराची चौकशी करावी; अन्यथा तीव्र अंदोलन केले जाईल.
शंकर ठोंबरे व रेश्मा शेख, ग्रामपंचायत कामगार
———————————————
नियमानुसार कामांची बिले दिली आहेत. त्यामुळे आर्थिक अनियमितेचा आरोप करणे गैर आहे. कामगार भरती हा प्रशासकाचा अधिकार आहे.
संजय साळुंखे, ग्रामविकास अधिकारी
प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली.
२१०५२०२१ बारामती—२६