मंचर उपजिल्हा रुग्णालयात नूतन सुविधांचे लोकार्पण वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. संजोग कदम, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक हर्षल मोरडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाका हिंगे, विवेक वळसे पाटील, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, अरुण गिरे, सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेल आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, बैलगाडा प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. या शर्यती सुरू राहाव्यात यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. राज्य सरकारची हीच भूमिका आहे. मात्र, बैलगाडा मालकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील तीन वर्षांपासून त्यावर सुनावणी झाली नव्हती. कोरोना असल्यामुळे न्यायालयात हा विषय आला नाही. मात्र, आता सरकारी वकील सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सरकारने न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी मोठे वकील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द करून शर्यत सुरू करणे हा एकमेव मार्ग असून बैलगाडा मालकांनी विनाकारण गैरसमज करून घेऊ नये. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय शर्यतीचा प्रश्न सुटणार नाही. केंद्र सरकारने बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये केला आहे. तेथून बैल हा शब्द वगळल्यास फायदा होईल. बैलगाडा मालकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेऊ, सर्वांची त्यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न राहील. मात्र, बैलगाडा मालकांनी नवीन खटले दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी. असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, कोरोना गेला असा काहींचा समज झाला आहे. मात्र, जगात अनेक देशात तिसरी लाट आली असून, महाराष्ट्रालाही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगतात. सर्व काही सुरू राहावे असा आग्रह आपण करतो. मात्र, लग्न समारंभ, दशक्रिया विधी, साखरपुडा या कार्यक्रमांमध्ये गर्दी वाढत असून त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतीसंदर्भात राजकारण सोडून सर्वजण एकत्र येऊ विशेष करून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाडा मालकांची समजूत काढली पाहिजे. सांगली भागात शर्यत झाली. ओझर येथे बैठक झाली. या बैठकीत पंधरा दिवसात शर्यती होतील, असे सांगितले आहे. तामिळनाडू राज्यात आंदोलन झाल्यानंतर जलीकट्टूला परवानगी मिळाली. महाराष्ट्रात शर्यतींना परवानगी मिळाली नाही तर पंधरा दिवसांत शर्यत भरवावी लागेल, असे विधान मी केले. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात ७५ खासगी डॉक्टरांनी अहोरात्र सेवा केली आहे. मानवतेच्या दृष्टीने येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यावेळी कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. माजी आमदार पोपटराव गावडे, डी. के. वळसे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी प्रास्ताविक केले. पूजा थिगळे हिने सूत्रसंचालन, तर पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांनी आभार मानले.