लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन वेबपोर्टलवरील माहितीचा गैरवापर करून अनेक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह दबावतंत्राचा वापर करून रद्द करण्यात आली आहेत. नाशिक आणि पुण्यात घडलेल्या या घटनांची व्याप्ती केवळ एका शहर किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित नाही. अशा ‘लव्ह जिहाद’चे लेबल लावण्यात आलेल्या प्रकरणांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, असे निवेदन ‘राईट टू लव्ह’च्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त तसेच राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांना देण्यात आले आहे.
निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हिंदू-मुस्लिम मुला-मुलींच्या होत असलेल्या आंतरधर्मीय विवाहांना ‘लव्ह जिहाद’चा रंग देऊन हे विवाह होऊ नयेत, यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला. त्यासंदर्भात सोमवारी राईट टू लव्हच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विवाह नोंदणीच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर प्रसिद्ध होत असलेल्या विवाहाच्या नोटीसचा गैरफायदा घेऊन आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो, हे निर्दशनास आणून दिले. तसेच अशाप्रकारे विवाहाची नोटीस प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक नसल्यामुळे ती पद्धत तत्काळ बंद करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ‘राईट टू लव्ह’चे अभिजित कांबळे यांनी सांगितले.