पुणे : नदी सुधार प्रकल्पांतर्गत (जायका) ११ ठिकाणी मलनि:स्सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रक ल्पांसाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी तीन जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यातील वारजे आणि बाणेर येथील दोन जागांच्या भूसंपादनासाठी रोख मोबदला द्यावा लागणार आहे. या भूसंपादनासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
शहरातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तब्बल ९९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१६ साली मान्यता मिळाली होती. या प्रकल्पांतर्गत ११ ठिकाणी एसटीपी उभारण्याचे काम सुरु आहे. या केंद्रांद्वारे ३९६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. योजनेंतर्गत ११३ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार असून, २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालिका आजमितीस ४७७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ही क्षमता ८७३ एमएलडी होणार आहे.
महिन्याभरात प्रकल्पाची निविदा काढण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि नितीन गडकरी यांनी पालिकेला केल्या आहेत. यापूर्वी वाढीव दराने आलेल्या निविदा रद्द करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे संपुर्ण प्रकल्पासाठी एकच निविदा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी पालिकेला अनुदान दिले आहे. भूसंपादन आणि देखभालीचा खर्च यामध्ये नसल्याने पालिकेला भूसंपादनचा खर्च करावा लागणार आहे. यापूर्वी ११ पैकी ८ जागा ताब्यात घेतल्या असून तीन जागांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे.
====
वारजे आणि बाणेर येथे उभारण्यात येणाऱ्या एसटीपींसाठी रोख मोबदल्याची मागणी करण्यात आली आहे. वारज्यातील १.२६ हेक्टर जागेमध्ये ३९ जागामालक असून त्यांना २६ कोटी २६ लाख रुपयांचा रोख मोबदला द्यावा लागणार आहे. तर, खराडी येथील ६०० चौरस मीटर जागेसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा मोबदला द्यावा लागणार आहे.