लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती दोनदा रद्द करण्यात आल्या. वारंवार मुलाखती रद्द केल्या जात असल्याने प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या ९ व १० डिसेंबरपूर्वी ‘कँस’चे कामकाज पूर्ण केले नाही तर विद्यापीठाच्या अधिसभेसमोर आंदोलन करण्याचा इशारा ‘स्पुक्टो’ संघटनेने दिला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे मार्च २०२० मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या ‘कँस’च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या मुलाखती स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे त्या पुन्हा एकदा स्थगित केल्या. विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक प्रसिध्द करून येत्या २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘कॅस’ अंतर्गत ४८४ प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे स्पष्ट केले होते. मात्र, पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या.
विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द केल्या जात असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू नितीन करमळकर यांना निवेदन देवून नाराजी व्यक्त केली.
चौकट
“कॅसबाबत शासनाने निर्देश दिलेले असतानाही विद्यापीठाकडून ‘कॅस’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या बैठकीत ९ व १० जानेवारीला होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.”
- प्रा. एस. पी. लवांडे, सचिव, एम. फुक्टो.