पुणे : आरक्षण पूर्णपणे नष्ट करता येणे शक्य नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूदही नाही. अजूनही समाजातील काही मागासलेले आणि दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.देशमुखमहाराज फाऊंडेशनने आयोजिलेल्या गंगाधर स्वामी पुण्यतिथी सप्ताहातील व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘वाढत्या जातीय अस्मितेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सप्ताहात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी, साहित्यिक बबन मिंडे, रा. स्व. संघाचे पश्चिम प्रांतप्रमुख हेमंत हरहरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तांबोळी म्हणाले, ‘जातीवाद ही अंधश्रद्धा आहे. संविधानाने धर्माला आरक्षण दिलेले नाही, तर मागासलेल्या वर्गाला आरक्षण दिले आहे. वाढत्या जातीय अस्मितेच्या जखमा समाजमनावर झाल्या आहेत. भारतीय संविधान आणि संसद हेच अंतिम सत्य आहे.’ देशमुख महाराजांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुवर्णा बोलघाटे, नरहर शिरोदे, संजय देशमुख, प्रवीण साळुंके, गणेश अनारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या जेवणातून आई लहान मुलांसाठी दोन घास बाजूला काढून ठेवते, यालाच आरक्षण म्हणतात. समाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज आहे.- न. म. जोशी