लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : राज्यातील बहुतेक सर्व शहरांत व ग्रामीण भागात अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब समोर आली होती. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचे आदेश शासनाने दिले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या तीन-चार महिन्यांत सतत बैठका घेऊन पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील शंभर वाड्या-वस्त्यांची नावे बदलण्यात आली.
याबाबत समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखरे यांनी सांगितले की, राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 6 मे रोजी स्वतंत्र समिती स्थापन केली. जिल्हास्तरीय समितीची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली बैठक झाली. २६ जूनला सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सदर दिवशी सर्व ग्रामपंचायत पातळीवर जातीवाचक असलेली गावे, रस्ते व वस्त्यांच्या नावांची यादी करून सदरील नावे बदलण्याबाबत गावकऱ्यांना अवगत करावे व सदरची कार्यवाही ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशी नावे बदलण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वेल्हा, दौड, सासवड, बारामती, मुळशी तालुक्यातील बदललेल्या वस्त्यांच्या, रस्त्यांच्या नावांची यादी जिल्हा समितीला सादर केली. या समितीने बदललेल्या नावांना मंजुरी दिली.
------
अशी बदलली नावे
मूळ नाव बदललेले नाव
न्हावी आळी संत सेना महाराजनगर
वडार गल्ली हनुमाननगर
दलितवस्ती आंबेडकरनगर
मातंगवस्ती अण्णाभाऊ साठेनगर