पुणे : मला कलाकार म्हणून जगण्याऐवजी माणूस म्हणून जगण्यात अधिक रस आहे. जात, धर्म. आणि कला याहीपलीकडे सर्वात अगोदर आपण माणूस आहोत. जमेल तसे कोणतीही कला घेऊन आपण आपले काम करावे. लोकांनी काय घ्यायचे हे त्यांनी ठरवावे,असे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले. विश्रांतवाडी, पुणे येथे झिवा स्टुडियो स्पेस याचे मंजुळे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड व पुणे मनपाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक हे उपस्थित होते. प्रज्ञेश मोळक यांनी नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली. मंजुळे म्हणाले , माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो. लोकांना त्या आवडल्या की नाही माहीत नाही. मला कथा सांगायला आवडतात व त्या मी सिनेमाच्या माध्यमातून दाखवतो. सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा करत असून, अजून दोन ते तीन सिनेमांचा विचार सुरु आहे. मंजुळे म्हणाले, सध्या तरुण नव्या उमेदीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात हे बघून आनंद होतो. झिवा स्टुडियो स्पेस हे असेच एक आहे जिथे वेगळं काहीतरी नक्कीच निर्माण होत राहील. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या काही कविताही सादर केल्या आणि लोकांची मने जिंकली. राजकारणापलीकडे जाऊन कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा माझा नक्की प्रयत्न करणार आहे. तरुणाईमध्ये फार कल्पकता आहे. अगदी खेड्यापाड्यातील तरुणसुद्धा यात मागे नाहीत. पारंपरिकता जपून आपण आधुनिक गोष्टी आत्मसात करून त्यांची सांगड घातली पाहिजे, असेही मंजुळे यांनी सांगितले. स्वप्नील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
जात, धर्म आणि कला याअगोदर आपण सर्व माणूस आहोत : नागराज मंजुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 6:56 PM
माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. पण खरंच फक्त मला कथा सांगायच्या होत्या आणि त्या मी जमेल तशा सांगत गेलो.
ठळक मुद्देसध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमाचे काम सुरु