पुणे : सध्या देशात लाेकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. जगातील सर्वात माेठ्या लाेकशाहीचा साेहळा नागरिक साजरा करत आहेत. उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान हाेणार आहे. पुण्यातही उद्या मतदान हाेणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुण्यातील एका मिसळ व्यावसायिकाने नामी शक्कल लढवली आहे. उद्या जे काेणी मतदान करुन येईल त्यांना एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्यात येणार आहे. पुण्यातील काेथरुड भागातील कडक मिसळ या मिसळ हाॅटेलमध्ये उद्या ही ऑफर ठेवण्यात आली आहे.
अनेक भागांमध्ये मतदानाची टक्केवारी फारच कमी असते. मतदान करुन काय हाेणार, काही बदल हाेणार नाही, असा विचार करुन नागरिक मतदान करण्यासाठी जात नाहीत. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून सिनेमा आणि फिरायला जाण्यात घालवण्यात येताे. अशाच नागरिकांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी पुण्यातील काेथरुड भागातील कडक मिसळचे मालक केतन तेंडले यांनी खास ऑफर ठेवली आहे. जे काेणी उद्या मतदान करतील त्यांना एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्यात येणार आहे. परंतु दुसऱ्या व्यक्तीने देखील मतदान करणे आवश्यक असल्याने तेंडले यांनी सांगितले.
तेंडले म्हणाले, गेल्या लाेकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्तीत जास्त तरुणांनी मतदान करावे यासाठी मतदान केल्यावर मिसळवर 50 टक्के डिस्काऊंट ठेवला हाेता. यंदा आम्ही सर्वांसाठीच मतदान केल्यानंतर एका मिसळवर एक मिसळ फ्री ठेवली आहे. मतदानाचा टक्का वाढवा हा या मागील आमचा उद्देश आहे. लाेकांनी मतदानाची सुट्टी न घेता आवर्जुन मतदान करण्यास जायला हवे. मतदान न करता अनेकजण व्यवस्थेवर ताशेरे ओढत असतात. असे न करता या लाेकशाहीच्या उत्सावार सहभागी हाेऊन लाेकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त लाेकांनी उद्या मतदान करावे.