बारामती : माझी दारूची भट्टी असली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत बारामती पोलिसांचे कान उपटले. पाहुणेवाडी येथे रविवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पवार यांचे भाषण सुरू असताना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी पवार यांना अवैध धंद्याबाबत पत्र दिले. हे पत्र भर सभेत अजित पवार यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आम्ही येतो दारूच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलिस निवांत पगार घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी दिलेले पत्र भर सभेमध्ये वाचून दाखवले. पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाणे यांना दारूबंदी होण्याबाबत पत्रव्यवहार केला होता मात्र त्यांनी दखल केली घेतली नाही. असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो नाहीतर हे पत्र मला कोणी दिलेत त्यांच्या मागे तुम्ही लागाल, अशा शब्दांमध्ये पोलिसांची भंबेरी उडवली.
ते पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे पवार म्हणतात सभेमध्ये एकच हशा पिकला.
ग्रामस्थांकडून दारू बंदीचे निवदेनपाहुणेवाडी गावात सर्रासपणे रात्रंदिवस अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. गावात अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. यामुळे गावात तंटा निर्माण होत असतो, ग्रामसभेत अनेकदा महिलांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार दारू बंदीचा ठराव होऊन देखील पोलीस प्रशासनाकडून निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे दारू बंदीचे निवेदन देण्यात आले.