डिंभे : पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांबरोबरच शिरूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणून या भागात हरितक्रांती घडविणाऱ्या डिंभे जलाशयातील पाण्याने आता तळ गाठला आहे. धरणाचे बॅकवॉटर असणाऱ्या घोड व बुबरा या नद्यांची पात्रे दूरपर्यंत कोरडी ठणठणीत पडली आहेत. यंदा पाण्याअभावी डिंभे धरणाच्या आतील पाणलोटक्षेत्र माळरान झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बेंढारवाडी, पाटण-कुशिरे आणि अडिवरे-बोरघर ही तीनही खोरी आटली आहेत. या भागात असणाऱ्या आदिवासी गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तहान भागविण्यासाठी खोल-खोल गेलेल्या पाण्याचा शोध घेत नदीपात्रात रोज नवीन खड्डा खणावा लागत आहे. पाणलोट क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी रोज पाठशिवणीचा खेळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच ठिकाणी आपले जुने घर होते. गावातील मंदिरे, भरणाऱ्या यंत्रांच्या जागा व पिढ्यान्पिढ्या पोटच्या मुलांपेक्षाही जिवापाड जपलेली वडोलोपार्जित शेतीवाडी. आंबा, जांभूळ, चिंचेच्या झाडाखाली सवंगड्यांसोबत घालविलेल्या बऱ्या-वाईट आठवणी या उघड्या पडलेल्या जागा पाहून प्रत्येकाच्या मनात काहूर ऊठत आहे. पाणी खाली खाली गेले की पुनर्वसित झालेली माणसांची पावले नकळत इकडे वळतातच. धरणात पाण्याचा ठिपूस नाही. नदीपात्रे कोरडी पडली आहेत. - धरणातील पाण्याने तळाचा ठाव घेतल असून, वचपे, फुलवडे व आंबेगाव ही पाण्याखाली गेलेली गावे उघडी पडली आहेत. आंबेगाव येथे असणारे पुरातन जैन मंदिर सध्या पूर्णत: उघडे पडले आहे. - तब्बल २० ते २५ वर्षांच्या कालावधीत पाण्याखाली राहूनही या मंदिराच्या भिंती शिलालेख, नक्षीकाम व मंदिरावरील मूर्ती जशाच्या तशा आहेत. पूर्वी आंबेगाव ही मोठी बाजारपेठ होती. येथे तेलाचे घाणे मोठ्या प्रमाणात चालायाचे. हे घाणे गाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दगडी उखळी अजूनही येथे पाहावयास मिळतात. यावरून येथे तेल गाळले जायचे याचा अंदाज येतो.
डिंभे धरणाचे पाणलोटक्षेत्र झाले माळरान
By admin | Published: June 05, 2016 3:36 AM