रावेत : मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे रावेत येथील शिंदे वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने यंदा समाधानकारक नालेसफाई केली नसल्याने त्याचा फटका आजूबाजूच्या वस्त्यांना बसला आहे. याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे फुलजाई चौकातून शिंदेवस्ती चौकाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. अशा रस्त्यांतून मार्ग करताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. रस्त्यांची तर पुरती वाताहत झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.अंतर्गत रस्त्यांबरोबरच मुख्य रस्तेही पावसामुळे वाहून गेले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दळणवळण यंत्रणा धीम्या पडल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यात आपटून वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. चाकरमान्यांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून चालणेसुद्धा अवघड झाले आहे.सध्या पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे परिसरातील सर्व खड्डे महापालिका प्रशासनाने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.महापालिका येथील रहिवाशांकडून कर घेते. त्यामुळे येथे पायाभूत सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु त्या दिल्या जात नसल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. पावसाने या भागाला पुरते धुऊन काढले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ येथील खड्डे बुजवावेत अन्यथा राष्ट्रवादी महिला संघाला याबाबत आंदोलन करावे लागेल.- पौर्णिमा पालेकर, कार्याध्यक्षा, महिला आघाडी, चिंचवडविधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस