पुणे : लष्कर परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून चिरीमिरी घेताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या पोलिस कर्मचाऱ्याची पैसे घेतानाची क्लिप मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. पोलिस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची नेमणूक लष्कर वाहतूक विभागात होती.
विजय कनोजिया हे ३० मार्च रोजी महावीर चौकात कर्तव्यावर होते. तेथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोहिनूर हॉटेलच्या बाजूने महावीर चौकाकडे एक दुचाकी आली. या दुचाकीचे नंबर फॅन्सी असल्याने कनोजिया यांनी त्यांना दंडात्मक कारवाईची भीती दाखविली. त्यानंतर दंडात्मक कारवाई न करता चिरीमिरी घेऊन त्या दुचाकीस्वाराला सोडून दिले. कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवून मार्च एन्ड एम जी रोड, असा मेसेज तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. कनोजिया यांच्या संशयास्पद वर्तनाची सोशल मीडियाच्या क्लीपमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढला आहे.
पाेलिस पाहतात सावजाची वाट
शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक चौकात वाहतूक पोलिस चौकापासून काही अंतरावर आडबाजूला उभे राहून वाहनचालक कधी नियम मोडतो आणि मी कधी त्याला पकडतो, अशा अवस्थेत थांबलेले असतात. वाहतूक नियमनापेक्षा वाहनचालकांना बाजूला घेऊन त्यांना दंडाची भीती दाखवणे यावर त्यांचा भर असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येते.